जळगाव, प्रतिनिधी । आज जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांच्याकडे राज्यातील सर्व नागरिकांचे लॉकडाउनमधील तीन महिन्यांचे १०० युनिट प्रतिमहिना असे वीज बिल माफ करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली.
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना या महासंकटामुळे अति गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सर्व उद्योगधंदे, व्यापार, नोकरदा-या, शेती व्यवसाय ठप्प झाल्यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. राज्यातील नागरिकांना शासनामार्फत सोशल मीडियाच्या मार्फत आश्वासित करण्यात आलेले होते की लाॅकडाऊनमध्ये प्रत्यक्ष विजेचे बिल आकारता येत नसले तरी जानेवारी फेब्रुवारी मधील विज बिलाच्या सरासरी असे बिल लाॅकडाऊन मधील मार्च-एप्रिल-मे या उन्हाळी महिन्यांचे येईल .परंतु तसे काहीएक झाले नाही. त्या महिन्यांमधील १०० युनिट प्रतिमहिना असे प्रत्येक नागरिकाचे तीन महिन्यांचे ३०० युनिट वीज बिल माफ करण्यात यावे. त्यांचे आता हजारो रुपयांचे आलेले विज बिल रद्द करून प्रतिमहिना १०० युनिट वीज बिल माफ करून १०० युनिटच्यावर असलेल्या विजेच्या युनिटचा दर आकारून तसे बिल नागरिकांना देण्यात यावे अशा प्रकारची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. अन्यथा सर्व सामान्यांच्या हितासाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.