रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारे आर्सेनिक अल्बम-३० ठरेल रामबाण औषध
जळगाव प्रतिनिधी । सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला असतांना या विषाणूला अटकाव करण्याची क्षमता होमिओपॅथीमधील आर्सेनिकल अल्बम-३० या औषधात असल्याची बाब ख्यातनाम होमिओपॅथ डॉ. जसवंतसिंह पाटील यांनी सिध्द केली आहे. त्यांनी अनेक रूग्णांसह पोलीस पथकावर केलेल्या उपचारातून ही बाब अधोरेखीत झाले असून हे औषध अतिशय परिणामकारकरित्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असल्याने जनतेचे तज्ज्ञांच्या मदतीने याचा वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
अॅलोपॅथीमधील एम.डी. असूनही होमिओपॅथीत आंतराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम असणारे डॉ. जसवंतसिंह पाटील यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी रामबाण ठरलेल्या औषधाबाबत प्रयोग केला असून याला व्यापक प्रमाणात प्रसिध्दी लाभली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने थेट डॉ. जसवंतसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला. हा वार्तालाप आपल्यासाठी सादर करत आहोत.
प्रश्न : कोरोनाच्या संसर्गातील धोका काय ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : कोरोना हा विषाणू अतिशय घातक असल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये याच्या संसर्गाने हाहाकार उडालेला आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरत असल्याने आपल्या देशातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी याचा यशस्वी प्रतिकार करण्यात आला नसल्याने अनेक ठिकाणी यामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या वाढली आहे. हा विषाणू तुलनेत नवीन असल्याने यावर थेट आणि परिणामकारक उपचार उपलब्ध नाहीत. यामुळे कोरोनाचा संसर्ग हा अतिशय घातक असून यापासून बचाव करणे आवश्यक आहे. यातील एक दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के रूग्ण हे औषधोपचार न घेता आपोआप बरे होतात. तर २० टक्क्यांना मात्र उपचाराची आवश्यकता भासते. यातूनच काहींचे मृत्यू ओढावतात.
प्रश्न : कोरोना बाधीतांच्या उपचारातील सर्वात महत्वाचा घटक कोणता ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी आजवर थेट कोणतीही उपचार पध्दती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, रोग प्रतिकारक शक्ती हा या विषाणूच्या उपचारातील सर्वात महत्वाचा घटक असल्यावर जगभरातील वैद्यकतज्ज्ञांचे एकमत झालेले आहे. अर्थात, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम, त्याला याची लागण होण्याचा धोका तुलनेत कमी असतो. तसेच लागण झालीच तरी रूग्ण लवकर बरा होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ज्याची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली त्याला कोरोनाची बाधा होत नसल्याचे आपण नि:संदिग्धपणे म्हणू शकतो. मात्र यातील एक बाब आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. ती म्हणजे, व्याधीग्रस्तांचा अपवाद वगळता कुणाच्या रोगप्रतिकारक शक्तीचे मापन केले जात नाही. खरं तर तशी कोणतीही प्रणाली उपलब्ध नाही. परिणामी कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडाला असतांना आपापली रोगप्रतिकारकता मजबूत करणे हाच सध्या तरी एकमेव मार्ग आहे.
प्रश्न : आपण म्हटल्यानुसार रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे हाच एकमेव मार्ग असला तरी यासाठी नेमका कोणता उपाय आहे ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : आपण होमिओपॅथीचा एक मूळ सिध्दांत लक्षात घ्यावा. तो म्हणजे- होमिओपॅथी ही उपचार पध्दती रोगांवर नव्हे तर मानवाच्या विविध संस्थांवर काम करते. मानवाला एकीकृत (होमोजिनिअस) सिस्टीम समजून ट्रिटमेंट केली जाते. यातील सर्वात महत्वाचा घटक हा अर्थातच वर नमूद केल्यानुसार रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी होय.
प्रश्न : रोग प्रतिकारकता वाढविण्यासाठी नेमके औषध कोणते ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : होमिओपॅथीमध्ये आर्सेनिक अल्बम-३० ( एसबीएल आर्सेनिक अल्बम ३० ) हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रामबाण मानले जाते. गत सुमारे दोनशे वर्षांपासून या औषधाचा अतिशय परिणामकारक वापर करण्यात येत असून अनेक असाध्य विकारांवर ते उपयुक्त ठरल्याचे सिध्द झालेले आहे. याचाच वापर करून आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवत कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करू शकतो.
प्रश्न : निव्वळ रोगप्रतिकारकता वाढल्याने कोरोनाला अटकाव कसा घालता येणार ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : आपण यासाठी कोरोना संसर्गाची प्राथमिक माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या विषाणूचा संसर्ग झाला असला तरी पहिल्यांदा याची फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. या प्रकारे बाधीत झालेले रूग्ण कोरोनाचे कॅरियर म्हणून काम करतात. या विषाणूचा प्रसार करण्यासाठी त्यांच्याच मोठा वाटा असल्याचे सिध्द झालेले आहे. यामुळे कोरोनाचे कॅरियर आणि अद्याप बाधा न झालेले लोक यांच्यासाठी होमिओपॅथीमधील आर्सेनिक अल्बम-३० ( एसबीएल आर्सेनिक अल्बम ३० ) अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. या दोन्ही गटातील आबालवृध्दांनी याला घेतल्यास त्यांची इम्युनिटी वाढून कोरोनाच्या संसर्गापासून ते दूर राहू शकतात.
प्रश्न : आर्सेनिक अल्बम-३० ( एसबीएल आर्सेनिक अल्बम ३० ) या औषधाचे डोसेस नेमके कशा प्रकारे घ्यावेत ? कोरोनाच्या प्रत्यक्ष रूग्णांसाठी याचा उपयोग आहे का व याचे साईड इफेक्ट काय आहेत ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : साधारणपणे आर्सेनिक अल्बम-३० या औषधाला सकाळ-दुपार-संध्याकाळ या प्रकारे तीन दिवसांपर्यंत औषधाचा डोस घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या रेड झोनमधील लोकांनी सात दिवसांनी पुन्हा याचा डोस घ्यावा असे अपेक्षित आहे. तर कोरोनाचा रेड झोन नसणार्या भागातील लोकांनी १५ दिवसांनी डोस रिपीट करावा असे मी आपल्याला सुचवितो. कोरोनाच्या संसर्गाच्या चार स्टेप्स आहेत. यातील दोन स्टेप्सपर्यंत होमिओपॅथीच्या निष्णात तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हेच औषध घेतल्यास चांगला परिणाम दिसू शकतो. तर होमिओपॅथीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. कारण याच्या औषधांमध्ये घातक रसायने नाहीत. यातील औषधांमध्ये केमिकल्सचा अंश असला तरी तो खूप सौम्य (डायल्युटेड) असतो. या नॅनो पार्टीकल्सचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. याचमुळे होमिओपॅथीची औषधे हे कुणीही न घाबरता घेऊ शकतो.
प्रश्न : आपण स्वत: या औषधाबाबत रूग्णांवर उपचार केले आहेत का ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : हो…उपचार केल्यानंतरच मी जगाला याबाबतची माहिती देत आहे. मी अनेकांना हे औषध दिले असून यामुळे त्यांना लाभ झाला आहे. राज्य राखीव दलाच्या धुळे येथील पथकातील कर्मचार्यांना आर्सेनिक अल्बम-३० या औषधाचे डोस दिल्यानंतर याचे उत्तम परिणाम दिसून आले आहे. हे जवान कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे कर्तव्य बजावून आल्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले. एकीकडे अन्य पोलीस कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात लागण झाली असतांना राखील दलातील जवानांना लागण न होण्याचे कारण हे फक्त आणि फक्त आर्सेनिक अल्बम-३० या औषधामुळे झाल्याचे माझे स्पष्ट मत आहे. विशेष बाब म्हणजे राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी नुकताच याबाबतची लेखी प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदविली आहे. याच प्रकारच्या प्रतिक्रिया या अन्य रूग्णांकडून आल्या असल्याने हे औषध अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. खरं तर, अलीकडच्या काळात आलेल्या स्वाईन फ्ल्यू, चिकनगुनिया, सार्स आदींसारख्या व्याधींमध्येही हे औषध अतिशय उपयुक्त ठरल्याचे सिध्द झालेले आहे. आणि कोरोना विरूध्दच्या लढ्यातही हेच रामबाण ठरणार असल्याचा माझा दावा आहे.
प्रश्न : आर्सेनिक अल्बम-३० या औषधाशिवाय आपण कोरोनाच्या प्रतिकारासाठी अजून काय सुचवाल ?
डॉ. जसवंतसिंह पाटील : कोरोनाच्या प्रतिकारासाठी चांगल्या प्रकारचे टॉनिक हे शरिराला आवश्यक आहे. विशेष करून झिंक या घटकाचा समावेश असणारे व सोबत मल्टी-व्हिटॅमिन्स व मल्टी मिनरल्स असणारे टॉनिक हे कोरोनाच्या प्रतिकारासाठी अतिशय आवश्यक असून सर्वांनी याचे सेवन करण्याचे मी सुचवितो.
दरम्यान, डॉ. जसवंतसिंह पाटील यांनी सुचविलेल्या होमिओपॅथीच्या उपचाराबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने राज्य राखीव दल अर्थात एसआरपीच्या धुळे येथील तुकडीचे महासमादेशक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, डॉ. जसवंतसिंह पाटील यांना एक ख्यातनाम होमीओपॅथ म्हणून मी ओळखतो. आमचे सहकारी हे अनेक रूग्णांच्या संपर्कात काम करत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भिती असते. यामुळे याचा प्रतिकार टाळण्यासाठी औषध सुचवावे अशी विनंती मी केली. यावर डॉ. जसवंतसिंह पाटील यांनी आम्हाला आर्सेनिक अल्बम-३० या औषधांचे डोसेस घेण्याचे सुचविले. आमच्या तुकडीतील ८२ पैकी ८१ जणांनी याचे नियमित सेवन केले. तर एक जण काही कारणाने ही औषधी घेऊ शकला नाही. यातील ८१ जणांना अद्याप कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला नाही. या औषधामुळे आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे आम्हाला दिसून आले आहे.