हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दोघांनी मागितली खंडणी; गल्ल्यातून काढले १७ हजाराची रोकड

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोसर खुर्द शिवार धुळे रोडवर असलेल्या मराठा दरबार हॉटेल मालकाला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयेश दत्तात्रय शिंदे (वय-२३) रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव जि.जळगाव यांचे धुळे रोडवर मराठा दरबार नावाचे हॉटेल आहे. गावातील करण उर्फ बंटी अनिल पाटील आणि सचिन सुनिल पाटील दोन्ही रा. भोसर ता.चाळीसगाव यांनी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता हॉटेलवर येवून धमकी दिली की, तुला जर हॉटेल चालवायची असेल तर दर महिन्याला ५ हजार रूपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगितल्यावर पैसे देण्यास जयेश शिंदे यांनी नकार दिल्यावर बंटी आणि सचिन यांनी दगडाने मारहाण करून  गल्ल्यातील १७ हजार ५०० रूपये जबरी काढून घेतले. तसेच जयेश शिंदे याला तलवारीने ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जयेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे करीत आहे. 

Protected Content