नवी दिल्ली । इव्हीएमबाबत कथित गौप्यस्फोट करणारा हॅकर सय्यद शुजा याच्या पत्रकार परिषदेमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आजच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. ते म्हणाले की, हॅकर सय्यद शुजा याची पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती. आशीष रे हे काँग्रेसच्या नॅशनल हेरॉल्ड या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात, तसेच या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते ? असा सवाल उपस्थित करत ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपाने केला आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत होणार्या पराभवासाठी काँग्रेस आत्तापासूनच कारणं शोधत आहेत. काँग्रेस पक्ष हा सुनियोजितपणे भारताचे संविधान आणि देशाच्या सर्वोच्च संस्थांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.