ज्ञानेश्‍वर मुळे नेमके कोणत्या पक्षात जाणार ?

कोल्हापूर प्रतिनिधी । भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे हे सेवानिवृत्तीनंतर राजकीय कारकिर्द सुरू करणार असून ते लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिलेच आत्मचरित्रपर पुस्तक माती पंख आणि आकाश या द्वारे स्वतःच्या आयुष्याचा संघर्ष मांडणारे व ज्यांच्या संघर्षातून शेकडो तरुणांनी प्रेरणा घेतली आहे, असे सर्जनशील लेखक आणि सध्याचे परराष्ट्र मंत्रालयातले सचिव ज्ञानेश्‍वर मुळे हे जानेवारी महिन्यात सेवा निवृत्त होत आहेत. निवृत्ती नंतर ते राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी सोबत संस्कृत व उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व असणार्‍या मुळेंनी रशिया, जपान,अमेरिका, सीरिया, मालदीव अशा विविध देशांमध्ये राजदूत म्हणून प्रभावी काम केलेले आहे. तेथील अभ्यासक्रमात त्यांची पुस्तके आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डीजीटल इंडियाला खर्‍या अर्थाने चालना दिली ती ज्ञानेश्‍वर मुळेंनीच ! पुर्वीचे किचकट पासपोर्टचे नियम सुटसुटीत करुन देशभरात प्रत्येक ६० किलोमीटर अंतरावर पासपोर्ट कार्यालयाचे जाळे उभारण्याची कामगिरी त्यांनी केली. विवाहित महिलांना पासपोर्ट काढतांना लग्नापुर्वीचे नाव व नंतरचे नाव या गोंधळामुळे पासपोर्ट मिळायला अडचणी यायच्या. तसेच अनाथ मुलांना.. ज्यांचे एकच पालक आहेत अश्यांना पासपोर्ट मिळायला अडचणी येत होत्या. त्यांनी या किचकट बाबी सुटसुटीत, कमी कागदात करुन टाकल्या. सोबत कमी कालावधीत देशभरात पासपोर्टचे जाळे उभारले त्यामुळे त्यांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍याने राजकारण जवळून पाहिलेले असते, त्यामुळे तिथे अधिक प्रभावीपणे काम करता येते म्हणून राजकारणात यावेसे वाटत असेल तर ते अधिक स्वागतार्ह म्हणायला हवे असे मत ज्ञानेश्‍वर मुळेंच्या राजकीय मित्रपरीवाराने काढलेले आहे.

मध्यंतरी ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यात झाले होते. यामुळे राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्ञानेश्‍वर मुळेंकडे राजीव गांधींपासून नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सर्वासोबतच कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच प्रशासनात वेगवान निर्णय घेण्याच कसब सुध्दा आहे. चांगले निर्णय घेण्यासाठी नियम बदलावे लागतात तसेच सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. त्यामुळे मुळेंनी आपल्या पक्षात यावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी दहा वर्षांपूर्वी राजू शेट्टी हेच प्रयत्नशील होते. शिवार ते संसद हे राजू शेट्टी यांचे आत्मचरित्र साडेचार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकात त्यांनी मुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांचे तपशीलवार विवेचन केले आहे. आता याच राजू शेट्टी यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रणांगणात उतरू शकतात.

ज्ञानेश्‍वर मुळे हे वरिष्ठ अधिकारी असून यांना चांगले वक्ते साहित्यिक-कवी म्हणून प्रतिष्ठा आहे. ते तरूणाईचे आयकॉनदेखील आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला ते आपल्याकडे असावे असे वाटते. भाजपतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी ज्ञानेश्‍वर मुळे यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले जाईल अशीही सध्या चर्चा आहे. ज्ञानेश्‍वर मुळे यांचं मूळ गाव अब्दुललाट हे हातकणंगले मतदारसंघात आहे . राजू शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांच्यासह काही नावे चर्चेत असताना मुळे यांच्या रूपाने एक स्वच्छ प्रतिमेचा.. दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा भाजपकडून दिला जावू शकतो. या मतदार संघात ज्ञानेश्‍वर मुळेंच अनाथांसाठी शाळा काढण्यापासून कला साहित्य, सांस्कृतीक क्षेत्रात पण मोठ योगदान आहे. यासंदर्भात कुठल्या पक्षाकडून ते उभे राहणार याबाबत मुळेंनी मौन बाळगले असले तरी राजकारणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. तसेच मुळेंचे समर्थक सोशल मीडीयाद्वारे एकत्र येवून रणनीती आखतांना दिसत आहे.राजकारणातील पुढील वाटचालाची घोषणा ज्ञानेश्‍वर मुळे ३१ जानेवारीला करण्याची शक्यता आहे. एकंदर प्रशासनात यशस्वी झालेले ज्ञानेश्‍वर मुळे राजकारणात कशी घोडदौड करतात हे पाहणे रंजक ठरेल.

Add Comment

Protected Content