हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहा- अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील

जळगाव प्रतिनिधी । बदललेली कार्यशैली आणि धूम्रपानामुळे हृदय विकाराचा धोका बळावतो. तो टाळण्यासाठी नागरिकांनी धूम्रपानापासून दूर राहावे. वेळोवेळी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी केले.

जागतिक हृदय दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाखले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी (बाह्य संपर्क), जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा बोराडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. फुलपाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे धूम्रपानापासून प्रत्येकाने दूर रहावे आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तर  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले, ताणतणावामुळे हृदय विकाराचा धोका बळावला आहे. तो टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. त्याप्रमाणे  डॉ. नाखले यांनी हृदय रोग होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी, हृदय विकाराची लक्षणे या विषयावर मार्गदर्शन केले. साथरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या समन्वय डॉ. स्वप्नजा तायडे यांनीही मार्गदर्शन केले.  चंद्रशेखर ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content