कासोदा, प्रतिनिधी | बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मकरसंक्रांतीनिमित्ताने हळदीकुंकू या कार्यक्रमात पहिली कन्या झालेल्या मातांना वडाचे रोप देऊन गौरविण्यात आले.
लेकीला जसा जीव लावतो, तसाच जीव सौभाग्याचे रक्षण करणाऱ्या वडाच्या झाडाचे संगोपन करुन वाढवावे, असे आवाहन याकार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्वला पाटील या होत्या. यावेळी माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशाद शेख, डॉ. सुचिता ठाकरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुलीचे महत्त्व, वडाचे सौभाग्याशी नाते, हळदीकुंकूच्या कार्यक्रमात पर्यावरणाचे महत्त्व, मुलींचे शैक्षणिक महत्त्व याबाबतची विस्तृत माहिती प्रास्ताविकात परिचारिका शोभा पाटील यांनी दिली. डॉ. शेख, महानंदा पाटील, मच्छिंद्र पाटील यांनी विचार व्यक्त केले. गावातील पहिली कन्या झालेल्या ५० मातांना यावेळी उज्वला पाटील यांनी स्वखर्चाने वडाचे रोप भेंट दिले. आशा सेविका व प्रा.आ.केंद्राच्या कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.