शेंदूर्णी येथे फिजीकल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

शेंदूर्णी, प्रतिनिधी । स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेला जनता कर्फ्यु काल संपल्यावर आज गुरुवार २ जुलै रोजी शेंदूर्णी येथील दुकाने व बँक उघडताच गावात फिजीकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठीआटोकाट प्रयत्न करत असतांना युनियन बँक सारख्या राष्ट्रीय कृत बँकेत मात्र फिजीकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी कोणतीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी ही बँक असतांना येथे नागरिक झुंडी करून मास्कचा वापर न करता रोडवर व बँकेच्या गेटमधून गर्दी करीत असल्याने व आपल्या ग्राहकांना फिजीकल डिस्टन्सिंग पाळण्याची सक्ती करण्यासाठी बँकेकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली आढळून आली नाही. बँक मॅनेजर व कर्मचारी आपली स्वतःची काळजी घेत असतांना ग्राहकांना मात्र वाऱ्यावर सोडत असल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात युनियन बँक व्यवस्थापन पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे दिसते. मुख्य रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील लोक व व्यावसायिक नाराजी व्यक्त करत आहेत. शेंदूर्णीमध्ये कोरोना संसर्ग झालेले ५ रुग्ण आढळून आल्यावर आषाढी एकादशी निमित्त पोलिस प्रशासनाने आयोजित केलेल्या शांतता सभेच्या बैठकीत गेल्या २८ जून पासून १ जुलै पर्यंत सर्वानुमते स्वतः जनता कर्फ्युचे आयोजन केले होते. येथील ६५ वर्षीय वृद्धाचा काल रात्री कोरोना संसर्गामुळे जळगाव येथील कोविड १९ दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शेंदूर्णी येथे आतापर्यंत ८ लोकांना कोरोना संसर्ग झाला असून एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील लोक व व्यावसायिक नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच नेहमीच गर्दी असलेल्या पहुर दर्जा चौकात वर्दळ व गर्दी आजही दिसून आली. नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यावर सूचना फलक लावूनही नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content