बुलढाणा – प्रतिनिधी । लोकनेते सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची आज 28 वी पुण्यतिथी साध्या पद्धतीने आयोजित सोहळ्याने साजरी झाली. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी बुलढाणा येथील समाधीस्थळी त्यांना आदरांजली अर्पण केली.
दरवर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिदिनी सिंदखेडराजा व खामगाव येथून स्मृती ज्योत काढण्यात येते व समारोप बुलढाणा येथे समाधी स्थळी होत असतो. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच राहून अभिवादन करावे असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले होते.
स्मृतीज्योतीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सिंदखेडराजा येथून गाडीमध्ये ठराविक कार्यकर्ते स्मृतिज्योत घेऊन बुलढाणा येथे आले. समाधीस्थळावर देखील जिल्ह्यातील ठराविक मान्यवरांनी हजेरी लावत स्व भास्करराव शिंगणे यांना आदरांजली अर्पण केली.
आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार राहुल बोन्द्रे, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, काँग्रेसचे नेते श्यामबाबू उमाळकर, पांडुरंगदादा पाटील यांची उपस्थिती होती.