अमळनेरात पाच लाखांचा गुटखा जप्त; एलसीबीची कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) । अवैधरित्या गुटख्याची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याने आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे ५ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्यात गुटखा विक्रीला बंदी असली तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. त्यात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा भावात गुटख्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे गुटखा विक्रीचे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. तर नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दीघावकर हे नुकतेच जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. जळगावला जाताना मंगरुळ येथे शाळेत थांबून अमळनेरमार्गे ते रवाना झाले होते. जळगाव येथे पोलिस दलाची बैठक घेऊन गुन्हेगारीचा आढावा घेऊन त्यांनी जळगाव जिल्हा गुटखामुक्त करण्याची जाहीर घोषणा केली. त्यानुसार गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचनाही पोलिस दलाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस दलाच्या अजेंड्यावर हा विषय प्राधान्याने घेण्यात आला आहे. 

अमळनेरातही छुप्या मार्गाने गुटखा विक्री होत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी पहाटे अमळनेर शहरात डेरा दाखल करून चोपडा रोडवरील मंगळनगरातील अट्टल गुटखा किंग गोकुळ जगन्नाथ पाटील याच्या घरात छापा मारला. यात घरातच पथकाला विमल गुटख्याचे २ पोते, सागर गुटख्याचे १० पोते, आणि मिराजचे ४ बाँक्स मिळून आला. त्याची बाजारभावानुसार ५ लाख १५ हजार १२० रुपये किंमत आहे. गोकुळ पाटील या गुटख्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सर्व माल जप्त केला आहे. यामुळे मोठे गुटखा रॅकेट उघड होण्याची शक्यताही पोलिसानी वर्तवली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ही सर्वाधिक मोठी कारवाई मानली जात आहे.  गोकुळ पाटील यांच्यावर गुटखा प्रकरणी  अमळनेर पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पोलिस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत. आज न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक नारायण पाटील हे.काँ. रामचंद्र बोरसे, हे. काँ. सुनील दामोदर, पोना. मनोज दुसाने, पो.काँ दीपक शिंदे, परेश महाजन आणि चालक प्रवीण हिवराळे यांनी गोकूळ पाटील याच्या घरावर छापा टाकला.

 

Protected Content