स्व. गलसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ बोढरे येथे वाचनालयाचे भूमिपूजन !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे वाचन संस्कृती तरूणांत जोपासावी या उद्दिष्टाने तालुक्यातील बोढरे गावात स्व. गलसिंग बंडु चव्हाण यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे भूमिपूजन आज करण्यात आले.

तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे वाचन संस्कृती हि लोप पावत चालली आहे. मात्र या उलट वाचन संस्कृती टिकून राहावी या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोढरे येथे स्व. गलसिंग बंडु चव्हाण यांच्या स्मरणार्थ भूमिपूजन बद्रीनाथ गलसिंग चव्हाण व उत्तम हारसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाची साथ सुरू असल्याने नियमांचे पालन करून भूमिपूजन  करण्यात आले. गावात सुसज्ज वाचनालय व्हावे यासाठी गावातील तरूणांनी गेल्या अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले आहे. परंतु वाचनालयासाठी जागाच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. मात्र समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून बद्रीनाथ गलसिंग चव्हाण यांनी आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ म्हणून वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. अल्पावधीतच सुसज्ज वाचनालय येथे उद्यास येणार असल्याने गावातील सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी आभार मानले. या भुमिपुजना प्रसंगी बोढरे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाब राठोड, उपसरपंच अर्जून राठोड, सदस्य रोहीदास जाधव, सदस्य प्रेम चव्हाण व जेष्ठ नागरिक उत्तम हारसिंग राठोड, अमरसिंह चव्हाण, उखडू चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Protected Content