कोरोना योध्द्यांचे थकीत वेतन द्या, अन्यथा आंदोलन- डॉ. पाटील

भुसावळ प्रतिनिधी । कोविडच्या प्रतिकारासाठी अविरत कार्यरत असणारे येथील ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमधील कर्मचार्‍यांचे वेतन गेल्या सात-आठ महिन्यांपासून थकीत असून ते न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळातील बहुतांश कोरोना रूग्णांचे उपचार हे ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये होत आहेत. अलीकडच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्याने येथील कर्मचार्‍यांवर आधीच खूप तणाव आलेला आहे. यातच येथील कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. यात वर्ग-१ अधिकार्‍यांचे वेतन सात महिन्यांपासून; वर्ग-२ कर्मचार्‍यांचे ९ महिन्यांपासून तर तृतीय वर्गातील कर्मचार्‍यांचे आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी एका बाजूने कोरोनाच्या सावटाखालील सेवा तर दुसरीकडे आर्थिक विवंचना यात हे कर्मचारी अडकलेले आहेत. या अनुषंगाने भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी आता या कर्मचार्‍यांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी केली आहे.

डॉ. पाटील यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आदींसह अन्य मान्यवरांना टॅग करून भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील अधिकारी व कर्मचार्‍यांची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. १५ दिवसांमध्ये वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. नि. तु. पाटील यांनी दिला आहे.

Protected Content