स्वस्त घराचे आमिष दाखवत एकाला 25 लाखांचा गंडा

mhada news

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत आपले स्वत:चे हक्काचे घर व्हावे यासाठी लोक घर घेण्याच्या नादात फसतात. म्हाडामध्ये घर मिळवून देतो, चक्क पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन 25 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड याने वर्ष 2011 ते 2012 दरम्यान त्याची माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख असून मला 25 लाख द्या, मी तुम्हाला म्हाडा मधले स्वस्तात आणि मोठं घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाकडून 25 लाख उकळले. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही मिळाले आणि पैसेही नाही मिळाले. त्यामुळे पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गायकवाडविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आरोपी नितीन गायकवाड हा यापूर्वी माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर त्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. याचाच फायदा घेत म्हाडा मधले घर तुम्हाला स्वस्तात राहायला देतो आणि त्यानंतर तुमच्या नावावर करुन देतो. त्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्याने एकाडून 25 लाख उकळले होते. याप्रकरणी आता मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी नितीन गायकवाड याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Protected Content