सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जामनेर(प्रतिनिधी) । सोशल मीडियावर “वंदे मातरम”या घोषणे बाबत आक्षेपार्ह विधान व्हायरल केल्याने येथील माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात CAA/NRC बाबतीत वातावरण ढवळून निघाले असून या नागरिकत्व कायद्याचा काही ठिकाणी विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. यात सोशल मीडियावर देखील विविध प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.याच विषयास अनुसरून जामनेर येथे काही दिवसांपूर्वी येथील एका तरुणाने सोशल मीडियावर “वंदे मातरम”अशी पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टवर जामनेर येथील माजी उपनगराध्य-जावेद मुल्लाजी याचा मुलगा शेख सईम मुल्लाजी याने आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. सदर शेख सईम याने सोशल मीडियावर व्हायरल केलेले आक्षेपार्ह विधान तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आणि सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. शेख-सईम याने “वंदे मातरम”बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जामनेर शहरासह तालुक्यातील वातावरण तापले असून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. शेख सईम मुल्लाजी याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या म्हणून व सोशल मीडियावर आक्षेपार्ह, व अश्लील वक्तव्य व्हायरल केल्या प्रकरणी शुभम माळी याच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत.दरम्यान शहरात काल रात्री गांधी चौकात काही वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

Protected Content