सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरीची घोषणा

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासह सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या १ हजार कोटीच्या रेल्वेमार्गास मंजुरी दिल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणार्‍या तीन यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० हजार घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करत आणली असून ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज, पाणी आणि चांगल्या रस्त्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. काही बाबी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामांनी गती घेतल्याचे ते म्हणाले. विकास हेच ध्येय ठेवून केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. सबका साथ सबका विकास ही आमच्या कामाची संस्कृती आणि परंपरा असल्याचे श्री. मोदी म्हणाले. सोलापूरहून उस्मानाबाद, असा चारपदरी महामार्ग राष्ट्राला अर्पण केला. यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची सोय उपलब्ध करुन देणार आहेत,भारतमाला योजनेंतर्गत अनेक रोजगाराच्या संधी युवा वर्गाला मिळाल्याचे ते म्हणाले.
सध्या देशात रेल्वेबरोबरच विमान वाहतुकीलाही महत्त्व दिले आहे. उडान योजनेंतर्गत विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाला आहे. राज्यातील ४ विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडान योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरु होईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Add Comment

Protected Content