सोलापूर (वृत्तसंस्था) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वत: पीपीई किट घालून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डाची पाहणी केली. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सची प्रशंसा करुन त्यांचे मनोबलही वाढवले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना वॉर्डातील रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या, शिवाय कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सची प्रशंसा करुन त्यांचे मनोबलही वाढवले. महत्वाचे म्हणजे चेंबरमध्ये बसूनच कोरोना रुग्णांची माहिती घेणारे रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना देखील पालकमंत्री कोरोना वॉर्डमध्ये गेल्याने, त्यांनाही तेथे जावे लागले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व बैठका आणि आढावा घेतला. त्यानंतर संध्याकाळी दत्ता भरणे यांनी थेट चक्क सिव्हिल हॉस्पिटल गाठले. पीपीई किट आणि मास्क घालून कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री भरणे यांनी आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डमध्ये घेऊन चला, मला तिथे रुग्णांशी संवाद साधायचा आहे, असे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर ते थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी संशयित रुग्ण, सारीचे रुग्ण, आयसीयू आणि बाधित स्त्री पुरुष यांच्यासह डॉक्टर आणि नर्सेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. शिवाय वॉर्डातील स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, सोलापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 860 वर पोहोचला असून आतापर्यंत 78 बळी गेले आहेत.