मुंबई (वृत्तसंस्था) ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही एसटी सेवा असणार आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या लोकांना प्रवास करायचा असेल तर त्यांची चाचणी होणार असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात येणार अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल. दरम्यान, ज्यांना खासगी वाहनाने वैयक्तिक प्रवास करायचा आहे. त्यांना तशी परवानगी देण्यात येईल. त्यांच्यासाठी सोमवारपासून एसटीचं पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवरून परवानगी घेतल्यावरच वैयक्तिक प्रवासाला मुभा देण्यात येणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.