सोनिया गांधींचा अर्णब गोस्वामीवर हल्ला

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । . इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव गोस्वामी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसात आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे आपण पाहिलं आहे. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला.

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झालेली दिसतेय, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे.

शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारने अहंकार आणि संवेदनाहिनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने कृषी कायदे घाईघाईत मंजूर केले. हे कायदे समजून घेण्यासाठी विरोधकांना संधीच दिली नाही आणि आता शेतकऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसने सुरुवातीलाच हे तिन्ही कायदे फेटाळून लावले होते. या कायद्यातून एमएसपीपासून ते अन्न सुरक्षेपर्यंतचे प्रश्न उपस्थित होत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. नव्या अध्यक्षाला या पाच राज्यातील निवडणुकांची तयारी करण्याचा वेळ मिळणार नाही, त्यामुळेच तूर्तास पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा पाच राज्यांच्या निवडणुकांवर फोकस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Protected Content