सोनार, पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर

WhatsApp Image 2020 01 25 at 7.46.57 PM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक फौजदार चंद्रकांत भगवान पाटील व सहाय्यक फौजदार भिकन गोविंदा सोनार या दोघा कर्मचार्‍यांना शनिवारी राज्य शासनाने राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. त्या दोघांचे पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

चंद्रकांत भगवान पाटील हे स्थानिक गुन्हे शाखेत तर भिकन गोविंदा सोनार हे मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत. या दोघा कर्मचार्‍यांचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी अभिनंदन केले आहे. सहाय्यक फौजदार भिकन सोनार यांचे मूळ गाव हे जळगाव आहे. त्यांनी त्यांच्या ३७ वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत यावल पोलीस स्टेशन, पहूर पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, पाचोरा उपविभागीय कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय येथे सेवा बजावली आहे. या काळात त्यांना २५० बक्षीसे मिळाली आहेत. यावल तालुक्यातील किनगाव व साकळी येथे कर्तव्य बजावत असतांना कायदा व सुव्यस्था धोक्यात आली असता, आपली जिवाची पर्वा न करता परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळविले होते. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. चंद्रकांत पाटील हे मूळ धरणगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांचा ३२ वर्षाचा सेवाकाळ झाला आहे. त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, संगणक विभाग, पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा याठिकाणी सेवा बजावली आहे. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करुन मोठा घातपात घडवून आणण्याच्या कटात सहभागी तसेच पाकिस्तानात घातपाताचे प्रशिक्षण घेतलेल्या कट्टर अतिरेक्यासह आरोपीना देशद्रोहाच्या गुन्ह्यात जळगावात एका धडक मोहिमेत अटक केली होती. तसेच पाक प्रशिक्षित अतिरेक्यांचे जळगावातील केंद्र उध्वस्त केले होते. यासह कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासह दरोडा, खून, घरफोडी या सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. याबद्दल ५०० बक्षीसे मिळविली असून कामगिरीबद्दल यापूर्वी चंद्रकांत पाटील यांना २००६ मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे. आता उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

Protected Content