भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या निधनाने एक सभ्य व सुसंस्कृत राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या पक्षाच्या नैतिक मूल्यांचा वारसा समर्थपणे जोपासणार्या या नेत्याने आजवरच्या राजकीय कारकिर्दीत अनेक जय-पराजय पाहिले. पण ते कधी विजयामुळे गर्वोन्नत झाले नाही तर पराजयाने गलीतगात्रही झाले नाहीत. संघ स्वयंसेवक व भाजपच्या साध्या कार्यकर्त्यापासून पुढील वाटचालीत आमदार, खासदार, नामदार व पक्षाच्या जिल्हाध्यक्षापर्यतची पदे मिळूनही हरीभाऊंवर अनेकदा अन्याय झाल्याचे दिसून आले. अगदी हाता-तोंडाशी आलेला घास गळून पडल्यागत समोर दिसणार्या पदांनी त्यांना हुलकावणी दिली. मात्र त्यांनी याबाबत कधी ना आदळ-आपट केली, ना कटुता व्यक्त केली. हा एकनिष्ठपणा व सोशिकता त्यांना अन्य सत्तालोलुप नेत्यांपासून वेगळेपण प्रदान करणारी ठरली. राजकीय कारकिर्द ऐन भरात असतांना हरीभाऊंची एक्झीट ही मनाला चटका लावणारी आहे. शिखरावरील ही भैरवी काळजात कालवाकालव करणारी ठरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी पहिल्यांदा जळगावात आणि नंतर मुंबई येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी माहित पडताच थोडे चमकल्यासारखेच झाले होते. काही दिवसांमध्येच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळाल्याने दिलासा मिळाला होता. यातच आज दुपारी हरीभाऊंच्या देहावसानाची माहिती समोर आल्यानंतर जबर धक्का बसला. खरं तर, त्यांना आदरांजली म्हणून काय लिहावे हे सुचेनासे झाले. यावल तालुक्यातील भालोद येथील शेतकरी कुटुंबातल्या हरीभाऊ जावळे यांच्या आयुष्यात राजकीय योग हा थोडा उशीरा आला असला तरी फार आधीपासून संघ स्वयंसेवकाच्या माध्यमातून समाजसेवेचा त्यांनी श्रीगणेशा केला होता. यामुळे त्यांनी साहजीकच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. नव्वदच्या दशकात राजकीय वर्तुळात तेजाने पळपणार्या एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून त्यांची राजकारणातील एंट्री ही १९९९च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या रूपाने तशी धमाकेदार झाली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला तरी २००७ साली तेव्हाच्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दिलेल्या संधीचे सोने करून ते संसदेत पोहचले. पुन्हा २००९ मध्ये विजय मिळवून ते संसदेत पोहचले. २०१४ साली पक्षाने दिलेले लोकसभेचे तिकिट ऐन वेळी कापले गेले. यानंतर ते आमदार झाले तर गत निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. अर्थात, आपल्या राजकीय कारकिर्दीत ते चार निवडणुका जिंकले तर दोन हरले. हार-जीतच्या निकषावर हरीभाऊ जावळे यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन केले असता ते नक्कीच यशस्वी राजकारणी ठरतात. मात्र याच्याही पलीकडे असणार्या अनेक निकषांवर हरीभाऊंची कारकिर्द तपासून पाहिली असता त्यांची महत्ता आपल्याला दिसून येते.
हरीभाऊ जावळे हे खर्या अर्थाने भूमिपुत्र होते. खरं तर शेतकर्यांची मुले असणारी अनेक मंडळी राजकारणात आहे. अनेक जण ही बाब अनेकदा अभिमानाने देखील मिरवतात. मात्र मातीची अस्सल जाण असणार्या मोजक्या नेत्यांमध्ये हरीभाऊंचा समावेश होता. ते स्वत: कृषी पदवीधर असून विविध प्रयोग करणारे प्रगतीशील शेतकरी होते. यामुळे आपल्या सात वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीत ते जेव्हाही लोकसभेत शेतीच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उभे राहत तेव्हा सर्व जण त्यांना गांभिर्याने ऐकत. कृषी विषयक प्रचंड अभ्यास असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा जाहीरपणे हरीभाऊंचे तोंड भरून कौतुक केल्याची बाब आपल्याला विसरता येणार नाही. पवार साहेबांसोबत हरीभाऊंचे अगदी शेवटपर्यंत पक्षीय राजकारणाच्या पलीकडेच संबंध होते. हेच संबंध राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरही त्यांनी जोपासले. खरं तर राजकारणात कुणी अजातशत्रू असू शकत नाही. तरीही हरीभाऊंचे कधी कुणासोबतचे संबंध विकोपाला गेल्याचे आपण पाहिले नाही. राजकारणात अतिशय दुर्लभ मानला जाणारा हा गुण त्यांच्यात होता.
ज्या मातीने आपल्याला घडविले, मोठे केले तिच्या ऋणातून उतराई होण्याचे प्रयत्न हरीभाऊ जावळे यांनी सातत्याने केले. यातून ते खासदार असतांना ‘मेगा रिचार्ज’ अर्थात महाकाय पुनर्भरण योजनेच्या माध्यमातून तापी नदी व सातपुड्याच्या पट्टयातील खालावलेली पाणी पातळी उंचावण्याचे एक भव्य स्वप्न त्यांनी पाहिले. यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. ही योजना पूर्तत्वाला गेल्यास ती हरीभाऊंना खर्या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे. जिल्ह्याच्या व त्यातही रावेर-यावल तालुक्यातील अर्थकारणाचा कणा असणार्या केळी पीकाबाबत भाऊंचे अध्ययन हे एखाद्या तज्ज्ञालाही लाजवणारे होते. केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कृषी संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी केळीबाबत ‘अॅक्शन प्लॅन’ आखण्याची तयारी केली होती. तथापि, त्यांना या पदावर काम करण्यासाठी खूप अल्प काळ मिळाला. त्यांनी ‘बनाना वाईन’साठी केलेले प्रयत्न अपुर्ण पडले तरी ‘ताप्ती व्हॅली बनाना फार्मर्स सहकारी संस्थेच्या’ माध्यमातून केळीचा बहुउपयोगी वापर करत त्यांनी ही संस्था उर्जीतावस्थेला आणली. याच प्रकारे मधुकर सहकारी साखर कारखान्यातील त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली आहे.
हरीभाऊ जावळे यांच्या राजकीय कारकिर्दीचे अचूक विश्लेषण एका लेखात करता येणार नाही. येथे याचा उल्लेख करणे अप्रस्तुत असले तरी यातील काही महत्वाचे टप्पे आणि यातील मर्म आपण समजून घेणे गरजेचे आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत हरीभाऊंना लोकसभेचे तिकिट मिळाले असते तर ते निश्चीत केंद्रात मंत्री झाले असते असे अनेकदा बोलले जात. त्यात तथ्यदेखील असले तरी खुद्द हरीभाऊंनी कधी यावर जाहीरपणे भाष्य केले नाही. किंबहुना त्यांच्या मनात याबाबत काही कटुता असल्याचेही कधी कुणाला कळले नाही. तर फडणवीस सरकारमधील राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात हरीभाऊंच्या नावाचा जवळपास समावेश झाला असतांना अचानक त्यांचे नाव मागे पडण्याची घटना देखील अनेक चर्चांना निमंत्रण देणारी ठरली. तथापि, त्यांनी स्वत: याबाबत कधीही जाहीरपणे भाष्य केले नाही. तसेच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावल-रावेर मतदारसंघातून गिरीश महाजनांचे समर्थक अनिल चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीने हरीभाऊ जावळे यांचा पराभव झाल्याची बाब जगजाहीर असतांनाही हरीभाऊंनी याबाबत तोंडातून चकार शब्द काढला नाही. ही सोशिकता त्यांना इतर उथळ नेत्यांपासून वेगळेपणा देणारी ठरली.
अगदी क्रिकेट खेळाडूंची उपमा द्यावयाची ठरली तर जळगाव जिल्हा भाजपमध्ये एकनाथराव खडसे व गिरीश महाजन हे अनुक्रमे सचिन तेंडुलकर व सौरभ गांगुली असतील तर हरीभाऊ जावळे यांना राहूल द्रविड मानावे लागेल. द्रविड प्रमाणेच हरीभाऊंवर खूपदा अन्याय झाला, त्यांना कधी फारसे वलय लाभले नाही. मात्र त्यांनी सारे काही निमुटपणे सहन करत पक्षसेवा केली. पक्षाने दिलेली प्रत्येक भूमिका समरसतेने पार पाडली. अलीकडच्या काळात भाजपमधील अंतर्गत कलहात त्यांना बरेच काही सहन करावे लागले. तथापि, त्यांनी कधी पक्षाचा अवमान होईल असे कृत्य केले नाही. यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष असतांनाच ते जग सोडून गेल्याची बाब ही फक्त योगायोग नसून ती त्यांच्या आयुष्याची कृतार्थता मानावी लागणार आहे. जिल्ह्याच्या व त्यातल्या त्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्या परिसरातील राजकीय व सामाजिक जीवनात हरीभाऊ जावळे नावाचा भला व इतरांची काळजी वाहणारा माणूस आपल्या कार्यकुशलतेची अमीट छाप सोडून गेलाय. त्यांना ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’तर्फे आदरांजली. मात्र राहून-राहून एकच वाटते की ”भाऊ खूप घाई झाली हो…!” अगदी शायरीत सांगावयाचे झाले तर-
बडे शौक से सुन रहा था जमाना मगर
तुम ही सो गये दास्ता कहते कहते…
:- शेखर पाटील