पुणे : वृत्तसंस्था । सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाच्या माहिती आधारे शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पुणे मुख्यालयातील दक्षिणी कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स युनिट आणि पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला होता, ज्यात सैनिक (जनरल ड्युटी) भरतीसाठी कॉमन एन्ट्रन्स परीक्षेची (सीईई) प्रश्नपत्रिका प्राप्त झाली
प्राप्त झालेली प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात नियोजित परीक्षेची असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर लष्कराच्या अधिकार्यांनी परीक्षा रद्द केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भरती प्रक्रियेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या जातील, असेही ते म्हणाले.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत माजी सैनिकाला आणि दोन नागरिकांना अटक केली आहे. पेपर कसे लीक झाले आणि संशयित ते कसे वितरीत करीत होते याचा शोध घेण्यात येत आहे. सध्या सेवेत असणाऱ्या जवानांच्या संभाव्य सहभागाचीही चौकशी केली जात आहे.
संशयितांनी प्रत्येक उमेदवाराकडून परीक्षेच्या पेपरसाठी ४ ते ५ लाख रुपये घेतले असल्याची माहिती चौकशीत उघडकीस आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील तसेच इतर राज्यांतील इच्छुकांशी त्यांनी संपर्क साधला होता.