नवी दिल्ली: वृत्तसंस्था । काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत आजही काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, या बैठकीत मेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मेमध्ये पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असली तरी या पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्यासह सुशीलकुमार शिंदे आणि मीराकुमार हे दोन्ही नेते शर्यतीत असल्याचं समजतं. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदे आणि मीरा कुमार यांची नावं आल्यामुळे चुरस वाढली असून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या कार्य समितीची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही. या बैठकीत मेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र गेहलोत यांनी दिल्लीत जाण्यास नकार दिला आहे. राजस्थानचीच जबाबदारी सांभाळण्यात स्वारस्य असल्याचं त्यांनी हायकमांडला कळवलं आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे काँग्रेसमधील असंतुष्टांच्या गोटातही शिंदे यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं सांगण्यात येतं. सध्या शिंदे दिल्लीत आहेत. अर्णव गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटप्रकरणाची माहिती घेण्यासाठी हायकमांडकडून शिंदे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं.
माजी लोकसभा अध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या मीरा कुमार या सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील दलित मतांची बेगमी करण्यासाठी मीरा कुमार यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. बहुजन समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या मतांना सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसकडून ही खेळी खेळल्या जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
मीरा कुमार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही नेते दलित आहेत. त्यामुळे त्याचा संपूर्ण देशात काँग्रेसला फायदा होऊ शकतो. शिवाय दोन्ही नेत्यांना मोठा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. शिवाय भाजपकडून त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केल्यास भाजपला दलित मतांचा फटका बसू शकतो, त्यामुळे काँग्रेसकडून दलित नेत्याला पक्षाध्यक्ष करण्याचा विचार केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं