सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना मालमत्ता करात फेरफार केल्या प्रकरणी दाखल असणार्या तक्रारी अर्जानुसार झालेल्या सुनावणीत अपात्र करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, राजेंद्र श्रीकांत चौधरी हे विद्यमान नगरसेवक असून त्यांच्या पत्नी हेमांगिनी चौधरी या २००६ ते २०११ या कालावधी सावदा येथील नगराध्यक्षा होत्या. त्या काळात राजेंद्र चौधरी हे नगरसेवक असून तेच नगराध्यक्षपदाचा कारभार पाहत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, याच काळात राजेंद्र चौधरी यांच्या कुटुंबियांच्या नावे असणार्या मालमत्ता करात खाडाखोड करून त्या कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. हा पदाचा गैरवापर असल्याचा आरोप करून गटनेते अजय भागवत भारंबे यांनी राजेंद्र चौधरी यांना अपात्र करण्यात यावे असा अर्ज जिल्हाधिकार्यांकडे केला होता.
या अर्जावर जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी झाली. यात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना अपात्र म्हणून घोषीत केले आहे. राजेंद्र चौधरी हे अलीकडच्या काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक तर आ. गिरीश महाजन यांचे समर्थक मानले जातात. या पार्श्वभूमिवर, राजेंद्र चौधरी यांच्या अपात्रतेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.