विरोधकांची दुटप्पी भूमिका-फडणविसांचा आरोप

मुंबई । केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करतांना विरोधी पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याआधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कृषी बाबत याच प्रकारची भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या घोषणापत्रात उल्लेख केला होता. त्यामध्ये काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल. शिवसेनेने तर फळं आणि भाजीपाला नियनमुक्त करण्याला समर्थन दिले होते. आजही ते नियमन मुक्त आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी ऑगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता. या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे, असे त्यांनीच सांगितले होते. याशिवाय, शरद पवार यांच्या आत्मचरित्रात सुद्धा या प्रश्‍नाचा सविस्तर उहापोह करण्यात आला असून त्यात त्यांनी तीच भूमिका मांडली, जे कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पारित केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, आज सारे पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत आहेत. आज केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप करत शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्‍चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Protected Content