जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारात तालुका पोलिसांनी सोमवारी अवैध वाळू वाहतूक करणार्या ८ ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॉलीसह ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहे.
याप्रकरणी मंगळवारी 9 नोव्हेंबर दुपारी तालुका पोलीस ठाण्यात दिनेश चांगो भोई रा. हरिविठ्ठल नगर व रवि सर्जू राठोड रा.समतानगर यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना सावखेडा शिवारात गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह कर्मचार्यांना सोबत घेत धडक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ट्रॉलीसह ८ ट्रॅक्टर तसेच २ दुचाकी असा १६ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे ट्रॅक्टर व दुचाकी सोडून चालक पसार झाले होते. याप्रकरणी मंगळवारी मंडळ अधिकारी योगेश्वर भगवान नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार करीत आहेत.