जळगाव, प्रतिनिधी | सालार नगर चौपदरी मार्गावरील हलीमा अपार्टमेंट जवळ रॅम्प व स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी न्हाईचे संचालक चंद्रकांत सिन्हा निवेदनाद्वारे दिला आहे.
जळगाव येथील इच्छादेवी ते अजिंठा चौक या चौपदरी महामार्गावरील हलिमा अपार्टमेंट लागून असलेल्या रहेमत,खदीजा, हलीमा,मालिक अपार्टमेंट्ससह सुमारे ४५० ते ५०० घरे आहेत. या नागरी वस्तीच्या शालेय विद्यार्थी ,महिला,पुरुष व त्यांची वाहने ही वस्तीतून निघताच महामार्गाच्या ऍप्रोच रोडच्या माध्यमाने महामार्गाला लागतात. परंतु, ऍप्रोच रोडचे रॅम्प मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात आलेले नाही. वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व झेंडू ठेकेदार कंपनीचे अजय वर्मा व सुजित सिंग हे प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच यावर उपाययोजना करण्यात यावी म्हणून जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी न्हाईचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत दि २० डिसेंबर पर्यंत सदर ऍप्रोच रोडवर रॅम्प व स्पीड ब्रेकर न झाल्यास २१ डिसेंबर मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देणारे निवेदन फारूक शेख यांनी दिले. त्याच्या प्रति जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ,सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव भाग, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.