सायबर चोरांच्या फसवणुकीचे सुशिक्षितच बळी

 

पुणे : वृत्तसंस्था ।  सायबर चोरटय़ांनी  वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवत गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरटय़ांच्या आमिषांना बळी पडणाऱ्यांमध्ये  सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे.

 

गेल्या सात महिन्यांत पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात दहा हजारांहून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 

राज्यातील पुणे-मुंबई या शहरात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढते आहे. अन्य शहरांच्या तुलनेत या दोन शहरांतील सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटय़ांच्या बतावणीला बळी पडणाऱ्यांमध्ये सुशिक्षित जास्त आहेत.

 

सायबर चोरटय़ांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यास विनंती स्वीकारू नका, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे काणाडोळा करत सामान्य सायबर चोरटय़ांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत.

 

गेल्या अडीच वर्षांत पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे फसवणुकीच्या ३२ हजार ७५४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी जुलै अखेरीपर्यंत सायबर फसवणुकीच्या दहा हजारांहून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 

पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष दूरध्वनी सेवा (हेल्पलाइन) कार्यान्वित करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्य़ांमध्ये तक्रार कशी करायची, याबाबतची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे एखादा फसवणुकीचा प्रकार घडल्यास त्वरित (गोल्डन अवर) तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यासाठी विशेष दूरध्वनी सेवा (व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक- ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५) उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारादार सायबर पोलीस ठाण्यात (०२०-२९७१००९७) या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.

 

 

डेबिट, क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक ,  अ‍ॅपद्वारे फसवणूक; ऑनलाइन खरेदी व्यवहारात गंडा , ’ बँकेतून बोलत असल्याची बतावणी , बँकेचे खाते हॅक करून फसवणूक , मोठय़ा व्यक्तीचे नाव वापरून आर्थिक मदतीचे आवाहन ,  परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष , परदेशातील व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष अशा कारणांनी अशी फसवणूक केली जाते .

 

Protected Content