मुंबई, वृत्तसेवा | सोमय्या मैदानाजवळ नव्याने घाऊक भाजी मार्केट सुरु करण्यात आले असून भाजीचे ट्रक व अन्य वाहने मोठ्या प्रमाणात आल्याने सायन येथे सकाळी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
सायन हायवे येथे भायखळा, दादर या परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी भाजी मार्केट हलविण्यात आले. येथे ट्रक, टेम्पोतून भाजी येत असतात व येथून मुंबईच्या विविध भागात पुरवठा केला जातो. भाजीपुरवठा सुरळीत होत असतांना आज या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आधीच भाजीचे ट्रक व टेम्पो मोठ्या संख्येने या भागात उभे असताना बस, कार, रिक्षा अशी वाहनेही रस्त्यावर उतरल्याने या भागात वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळाले. काहीही झाले तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे, असे सरकारचे स्पष्ट निर्देश असतानाही सायन भागात झालेल्या या वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनेक सवलती देऊ केल्या आहेत. अशावेळी मुंबईत अशी वाहतूक कोंडी झाल्यास सवलतींपुढे नव्याने प्रश्नचिन्ह उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.