” साधू ” शब्द बजरंग दलाला खटकला ; नाट्य महोत्सवच रद्द !

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था । ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) संस्थेतर्फे मध्य प्रदेशातील नाट्य  महोत्सवात सादर होणाऱ्या विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ नाटकाच्या ‘जात ही पूछो साधू की’ या हिंदी अनुवाद असलेल्या प्रयोगाला केवळ शीर्षकात ‘साधू’ असल्याने बजरंग दलाने विरोध केला. त्यामुळे आयोजकांना हा नाट्य महोत्सव रद्द करावा लागला.

 

नाटकाविषयी काहीही जाणून न घेता प्रयोगासाठी विरोध झाल्याचा आरोप करीत देशभरातील रंगकर्मींनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तेंडुलकरांच्या या नाटकाला विरोध हे सांस्कृतिक अज्ञानाचे दर्शन आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. नाटकाच्या शीर्षकाचा ‘साधू’ या शब्दाशी कोणताही संबंध नाही. हे शीर्षक नाटकाच्या अनुवादकाने एका दोह््यावरून घेतले आहे. त्याचा राजकीय किंवा धार्मिकतेशी संबंध नाही, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले.

 

जे नाटक सेन्सॉरसंमत आहे, अशा नाटकाचा प्रयोग बंद पाडणे हे कोणत्याही सुबुद्ध रंगकर्मीला मान्य होणारे नाही, असे मत प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केले. आपले मतभेद असतील तर ते वैध मार्गाने लिहून, टीका करून व्यक्त करण्याची संधी आपल्या घटनेने आपल्याला दिली आहे. त्यामुळे बळजबरी करून, धाकदपटशा दाखवून, भीती दाखवून, दहशत निर्माण करून कलेवर बंधने आणणे योग्य नाही. यामध्ये अंतिमत: कलाकारांचेच नाही, तर सर्व समाजाचे नुकसान आहे. भीतीपोटी कलाकार मग स्वत:च काही गोष्टी सेन्सॉर करायला लागतात, ही मला अतिशय चिंताजनक बाब वाटते, असे पेठे यांनी सांगितले.

 

बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र शिव्हारे यांनी, आपल्या संघटनेने कोणतीही धमकी दिल्याचे नाकारले असून, केवळ पोलीस आणि प्रशासनास पत्र लिहून या नाटकांच्या प्रयोगांना बंदी करावी, अशी मागणी केल्याचा खुलासा केला आहे.

 

झाले काय?  ‘पाहिजे जातीचे’ या तेंडुलकरांच्या नाटकाचे हिंदीत ‘जात ही पूछो साधू की’ या शीर्षकाने रूपांतर झाले आहे.  नाटकाच्या नावात ‘साधू’ हा शब्द कशासाठी?’ असा आक्षेप घेत बजरंग दलाने, ‘तुकडे तुकडे गँग’ कलेच्या नावाखाली तरुणाईला भडकवण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे नाट्य महोत्सव रद्द करण्यात आला.

 

नाटकाविषयी माहिती नसताना केवळ शीर्षकावरून विरोध करणे हे गैरसमजुतीतून  घडले असावे. तेंडुलकर यांचे हे नाटक आपल्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारे आहे. एक मुलगा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला असताना त्याची उडणारी त्रेधातिरपीट या विषयावर त्यांनी उपहासात्मक भाष्य केले होते, याकडे रंगकर्मी सतीश आळेकर यांनी लक्ष वेधले.

 

ज्या लोकांनी गदारोळ माजवला, त्यांना हे नाटक कोणत्या विषयावर आहे याची कल्पना आहे, असे मला वाटत नाही. जनतेला विचार करण्यास भाग पाडेल, अशा कोणत्याही कामास अथवा निवेदनास या हिंदुत्ववादी संघटनेस मान्यता द्यायची नाही. तेंडुलकर यांच्या नाटकाला घेतलेला आक्षेप हा मुनावर फारुकी याच्या अटकेशी साधम्र्य दर्शवतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांना त्रासदायक वाटतील, अशा कोणत्याही विचारांपासून इतर समाजाला दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असे  अभिनेते नासीरुद्दीन शाह यांचे म्हणणे आहे

 

 

 

‘इप्टा’चे ‘जात ही पूछो साधू की’ नाटकाचे आतापर्यंत विविध भाषांतून शेकड्यांनी प्रयोग झाले. आक्षेप घेणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकत्र्यांनी हे नाटक वाचलेले किंवा पाहिलेलेही नाही असे आयोजकांचे म्हणणे आहे

 

 

 

तेंडुलकरांचे ‘पाहिजे जातीचे’ हे नाटक रंगभूमीवर येऊन प्रदीर्घ काळ लोटला आहे. कुणीच त्यावर कधी आक्षेप घेतल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. असे असताना आताच अचानक त्यावर का आक्षेप घेतला जावा, हेच कळत नाही. शिक्षणव्यवस्था आणि जातव्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक आहे. त्यात आक्षेपार्ह असे काय आहे? ती वस्तुस्थिती तर आहे.असे  रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या

Protected Content