साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती करावी ; शरद पवार यांची सूचना

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात भासणारा प्राणवायूचा तुटवडा चिंतेचा विषय असून राज्यातील साखर कारखान्यांनी प्राणवायूची निर्मिती व पुरवठा करावा, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

 

शरद पवार यांच्या सूचनेनुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने प्राणवायू निर्मिती व पुरवठ्याबाबत साखर कारखान्यांची ऑनलाइन बैैठक घेतली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी उपस्थित होते.

 

प्राणवायू प्रकल्पाला वाफ आणि विजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज सहज उपलब्ध होते. त्यामुळे कारखान्यांना प्राणवायू प्रकल्प उभारण्यास कमी खर्च येईल, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी नमूद केले आहे.

 

ज्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवनी प्रकल्प कार्यरत आहेत. अशा प्रकल्पांमध्ये वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे अशा कारखान्यांनी प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. कारखान्यांना आसवनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त प्राणवायू वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात तांत्रिक प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

 

राज्यातील ७७ कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प असून त्यांच्या क्षमतेनुसार रोज मोठ्या प्रकल्पांत १० ते १५ टन प्राणवायूची निर्मिती होऊन १ हजार टाक्यांचा पुरवठा करता येईल.  लहान प्रकल्पांंत ५ ते ७ टन प्राणवायू निर्मिती शक्य होईल.

 

काही परदेशी कंपन्या हवेतील प्राणवायूचा वापर करून रुग्णालयांंसाठीच्या प्राणवायूची निर्मिती करता येईल अशी छोटी यंत्रणा उपलब्ध करून देत आहेत. ही यंत्रणा कारखान्यांनी बसवल्यास रोज २ ते ५ टन प्राणवायू तयार होऊन सुमारे २५० टाक्यांचा पुरवठा करता येईल, असे साखर कारखान्यांना सांगण्यात आले.

 

तातडीने प्राणवायूची गरज असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी छोटे यंत्रही आपापल्या भागातील  लोकांना उपलब्ध करून द्यावे. त्याद्वारे एकावेळी दोन रुग्णांना काही काळासाठी प्राणवायू देता येतो अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर ७ ते ८ कारखान्यांनी ५०० यंत्रांची मागणी लगेच नोंदवली. प्राणवायू प्रकल्प उभारण्यातही काही कारखान्यांनी रस दाखवला.

Protected Content