मुंबई (वृत्तसंस्था) साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने आता वादाला मिटला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सगळ्या मागण्या ऐकल्या तसेच त्या मान्यही केल्या. त्यांच्या आश्वासनानंतर शिर्डीकर समाधानी आहेत. आता नवा कोणताही वाद निर्माण होणार नाही, असेही आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले असल्याचे शिर्डी संस्थानचे कमलाकर कोठे यांनी म्हटले आहे. शिर्डी व पाथरीकरांनी आजच्या बैठकीत सामोपचाराची भूमिका घेतली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव योजनेसाठी निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला.