जळगाव प्रतिनिधी । विहीरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आज जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. मच्छिंद्र शालीक पाटील (वय-३६) रा. रेल ता.एरंडोल असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, ४ एप्रिल २०१४ रोजी पिडीत मुलगी आपली आजी व भावंडांसह शेतात गेली होती. शेजारच्या शेतात पाणी घेण्यासाठी पिडीत मुलगी भांवंडासह गेली असता आरोपी मच्छिंद्र पाटील याने पिडीत मुलीला जवळ बोलावर तिच्या छातीवर हात फिरवून विनयभंग केला होता. याप्रकरणी तालुका पोलीसात आरोपी मच्छिंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधिश आर.जे.कटारीया यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तीची बहिण व आजी या तीघांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणीअंती न्यायालयाने मच्छिंद्र याला दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. तर मच्छिंद्र याच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणातर्फे अॅड.प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.