सर्व परीक्षा रद्द तरी दहावीची सुरूच ! : शिक्षण मंडळाला कोरोनाचे गांभीर्य नाही

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर, विविध विद्यापीठांसह सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असतांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला याचे गांभीर्य नसल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातच विविध विद्यापीठांनी आपापल्या परीक्षा पुढे ढकलल्या असून शाळा व महाविद्यालये देखील ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. असे असले तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी दहावीची परीक्षा नियमीतपणे घेण्याचे कारण काय ? हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. राज्यभरात दहावीच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असून बर्‍याचशा विद्यार्थ्यांचे पालक त्यांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी जात असतात. यामुळे शाळांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असते. अर्थात, परीक्षागृहांमध्येही एका वर्गात किमान ३० विद्यार्थी असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्याची बाब उघड आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षादेखील पुढे ढकलल्या आहेत. या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मात्र निर्धास्त असल्यासारखे वागत असल्याची बाब ही अतिशय धक्कादायक अशीच आहे. परिक्षेच्या दरम्यान विद्यार्थी, शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांपैकी कुणाला याचा संसर्ग झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.

Protected Content