सराफांना लुटणारी टोळी पकडली

 

नगर : वृत्तसंस्था । पाळत ठेवून सराफांना लुटणाऱ्या आतंरजिल्हा टोळीचा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये सराफी व्यावसाय करणाऱ्या दोघा बंधुंना मारहाण करून ७० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका सराफाचाही समावेश असून, त्यानेच आरोपींना माहिती देऊन हा गुन्हा करवून घेतल्याचा संशय आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. अतुल पंडीत (रा. मिरजगाव) आणि त्यांचे बंधू दुकान बंद करून कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले. कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग घेऊन चोरटे पसार झाले. दरोड्याच्या या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख, १६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यांचे अन्य साथीदार अद्याप फरारी आहेत.

घटना घडल्यानंतर नागरिक मदतीला धावले. त्यामुळे चोरटे एक दुचाकी तेथेच सोडून पळाले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार आण्णा गायकवाड (वय २८, रा. विनोदेवस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे), संदेश डाडर ( रा. लांगोरगल्ली, कर्जत), भारत साळवे (वय २४, रा. राशिन, ता कर्जत), गणेश माळवे ( रा. रायकरमळा, यवत, जि. पुणे), अक्षय धनवे (रा. प्रेमदान हाडको, नगर) व राम साळवे (रा. राशिन ता. कर्जत) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.

, यातील आरोपी माळवे हाही सराफ आहे. मिरजगावमध्ये एका नातेवाइकाकडे येत असल्याने त्याला पंडित यांच्यासंबंधी माहिती होती. त्यानेच ही माहिती आरोपींना पुरवून हा गुन्हा घडवून आणला. लुटीच्या मालात त्याचाही वाटा ठरलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांच्याविरूद्ध नगर जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भात विविध गुन्हे दाखल आहेत. यातील सराफ माळवे केवळ पैशांसाठी आरोपींना टीप देत असे की आणखी काही व्यावयासिक कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Protected Content