सरकार संवेदनशील, असल्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा ; अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदी सरकार निर्णयाबद्दल संवेदनशील, तत्पर, खूप काम करणारे असल्याचं चित्र निर्माण करण्यासंदर्भात मार्गदर्शन  ३०० वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका कार्यशाळेत करण्यात आलं  .

 

केंद्र सरकारच्या ३०० उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी योग्यपद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्यासंदर्भातील एका कार्यशाळेला नुकतीच हजेरी लावली. माय गव्हरमेंट  उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिषेक सिंह यांनी ही कार्यशाळा घेतली. लोकांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या या उपक्रमाचे प्रमुख   सिंह यांनी या कार्यशाळेमध्ये लोकांसमोर ‘सरकारची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे’ आणि ‘सकारात्मक गोष्टी तसेच सरकारच्या चांगल्या कामांच्या माध्यमातून सरकारबद्दल सकारात्मक मतप्रवाह निर्माण करणे’ यासंदर्भात मार्गदर्शन केलं.

 

९० मिनिटांच्या या व्हर्च्यूअल कार्यशाळेमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी झाले होते. देशामध्ये दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकार देशातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याची टिका सर्वच स्तरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आय़ोजन करण्यात आलं होतं.

 

सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांनी या कार्यशाळेला हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. सकारात्मक बातम्यांवर आपण लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असं यावेळी जावडेकरांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतं. अशाप्रकारे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच सरकारच्या इमेज बिल्डींगसाठी अशी कार्यशाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी व . सिंह यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे.प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी असणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी माध्यमांच्या उपसचिवांनी या कार्यशाळेला हजेरी लावल्याचा खुलासा  एका अधिकाऱ्याने केला. केवळ प्रसिद्धी पत्रकं काढून काहीही होत नसून सकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली. प्रसिद्धीपत्रक पोस्ट करण्याऐवजी जास्त इम्प्रेशन (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतील असे) फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्याचा सल्ला कार्यशाळेत माध्यम उपसचिवांना देण्यात आला.

 

सध्याच्या काळामध्ये आलेल्या माहितीसंदर्भात थोडा जरी उशीर केला तरी प्रसारमाध्यमे त्याची बातमी करुन संपूर्ण गोष्टींला वेगळ्याच दृष्टीकोनातून मांडू शकतात, असं प्रेझेंटेशनमध्ये सांगण्यात आलेलं. तुमच्याकडे मंत्रालय आणि मंत्र्यासंदर्भातील माहिती सर्वात आधी येत असल्याने ती सकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचेल यामध्ये तुमची भूमिका फार महत्वाची ठरते, असं अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं.

 

एका अधिकाऱ्याने लस घेण्याच्या तयारीत असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींचा शोध घेण्यास सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भातील सकारात्मक दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहचवता येईल असं सांगण्यात आलं.  सोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट पद्धतीने माहिती कशी फिरवली जाते, त्याला प्रतिसाद कसा मिळतो, माहिती कशी वापरावी यासंदर्भातील मार्गर्शन करण्यात आलं. काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे अपयश मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र आहे.

 

Protected Content