मुंबई/ नागपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोणाच्यातरी पाठबळाने ‘मातोश्री’ च्या आत शीरण्याचा प्रयत्न होत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी काय करावे हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्याचा भिकारीपणा महाराष्ट्राला आलेला नसल्याचा टोला खा. संजय राऊत यांनी दिला आहे.
राज्यात एकीकडे मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे तर, हनुमान चालिसा वरुन शिवसैनिक आणि राणा दांपत्य आमने-सामने आले आहेत. अमरावतीच्या आमदार आणि खासदार राणा दांपत्याने शनिवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती.
राणा दांपत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासूनच शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेरील बॅरिकेट्स तोडून शिवसैनिक इमारतीत घुसले आहेत. असे असले तरी राणा दांपत्य त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर खा. संजय राऊत यांनी नागपूरप्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना प्रतिक्रिया दिली .
केंद्रीय तपास यंत्रणा, राष्ट्रपती राजवट या पोकळ धमक्या देऊ नका, शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. बायकांच्या आडून भाजपा शिखंडीचे उद्योग करत आहे ते बंद करा. केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक यासाठी सक्षम आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.