जळगावात अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई : नागरिकांनी विरोध करत घातला गोंधळ(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | तांबापुरा मधील महादेव मंदिर ते श्यामा फायरपर्यंतचे जवळपास २५० अतिक्रमण आज जेसीबीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी अतिक्रमण पथकास विरोध केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

 

आज श्यामा फायर ते महादेव मंदिर ते डी. मार्ट पर्यंतचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे काढण्यात आले. यात श्याम फायर ते महादेव मंदिर दरम्यान पाणपोई, पत्री शेड काढण्यात आले. तसेच माया देवी मंदिर ते गुरुद्वारा पर्यंत १८ मीटर रस्त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले होते. या रस्त्यावरील कंपाऊंड वाॅल, शेड, दुकाने जेसीबीच्या सहाय्याने काढून ९ मीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला. या परिसरात मोजमाप केले असता काही पक्के घरे, दुमजली इमारती देखील अतिक्रमित असल्याचे आढळून आले आहे. या अतिक्रमणधारकांना ७ दिवसाच्या आत हे अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा बजवण्यात आल्या.आज जवळपास २५० अतिक्रमणे काढण्यात आली.
दरम्यान, इच्छा देवी ते डी-मार्ट पर्यंतचे अतिक्रमण दुपारी १ वाजेच्या सुमारास काढत असतांना नागरिकांनी अतिक्रमण पथकास विरोध केला. आम्हाला गटारीपासून ७ फुट पर्यतचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना महापालिकेने दिलेले आसतांना आज १० फुट काढण्यास का सांगण्यात येत आहे ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करताच एकच गोंधळ उडाला. यात एकाच बाजूचे अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वी महपालिकेने दिलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी स्वतः हून ५ फुटांपर्यंत अतिक्रमण काढलेले असल्याचे त्यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या निर्दशनास आणून दिले. मात्र, कोणताही तोडगा निघत नसल्याने पाहून या नागरिकांनी थेट महापालिका गाठून महपौर जयश्री महाजन यांच्याकडे आपली व्यथा मांडली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्व नागरिक माघारी फिरले.
अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, संजय ठाकूर, किशोर सोनवणे, नाना कोळी, नगररचनाचे जयंत शिरसाठ, चित्रशाखेचे सुहास कोल्हे, श्री. विसपुते व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content