सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची तालिबान्यांची सूचना

 

काबुल : वृत्तसंस्था ।  काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी सांगितले आहे. तालिबानने कर्मचाऱ्यांना ‘माफी’ दिली आहे. विश्वासाने आपली दिनचर्या सुरू करू शकता, असे तालिबानने म्हटले आहे.

 

 

अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल २० वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या. त्यानंतर तालिबाननं अख्खा अफगाणिस्तानच आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे. अनेक नागरीकांनी देश सोडला आहे. राष्ट्रपतींसह अनेक राजकीय नेते देशातून पळून गेले आहेत. तालिबान्यांनी देशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी उत्सव साजरा करत आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी काबूलमधील राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. काबूलच्या रस्त्यावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी भीतीग्रस्त लोकांचे लोंढे काबूल विमानतळावर दाखल झाल्याने सोमवारी सकाळी तेथे अभूतपूर्व अनागोंदी माजली. यावेळी झालेल्या रेटारेटीत सात जणांचा मृत्यू झाला. अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने आणि विमानतळावर रेटारेटी झाल्याने मनुष्यहानी झाली.

 

तालिबानी बंडखोरांनी काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी तालिबानने आपले सैनिक बसवले आहेत. अनेक वसाहतींमधील नागरिक घराबाहेर पडलेले नाहीत. शहरात लुटमारीच्या, सशस्त्र तालिबान्यांच्या दहशतीच्या तुरळक घटना घडल्या. शहरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी वाहतूक होती. शहरातील प्रमुख चौकांपैकी एका चौकात तालिबानी सैनिक वाहनांची तपासणी करताना दिसत होते.

 

काबूलमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण होते. काही नागरिक घरात लपून बसले होते. तालिबानने चौकांमध्ये सैनिक तैनात केले होते. काही ठिकाणी लुटालूट झाली. बंदूकधारी तालिबान्यांनी काही घरांचे दरवाजे ठोठावले. परंतु अशा प्रकारच्या घटना तुरळक प्रमाणात घडल्या. रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी वाहतूक होती. तालिबानी सैनिक वाहनांची तपासणी करीत होते. पोलिसांसमोर तालिबानी बंडखोरांनी हजारो कैद्यांना मोकळे केल्याचे सांगण्यात आले.

 

समाजमाध्यमातील चित्रफितीत अनेक लोक धावपट्टीकडे पळताना दिसतात. त्यावेळी अमेरिकी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबाराचाही आवाज ऐकता येतो. काही जण जिन्यांवरून विमानात जाण्यासाठी रेटारेटी करतात. अनेक लोक अमेरिकी हवाई दलाच्या विमानाच्या दिशेने धावताना दिसतात, तर काही जण विमानात बाजूने चढण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

 

Protected Content