मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी अनास्थेचे बळी आहेत. म्हणून शिंदे फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गावर भिषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. अपघातातील मृत्यांना श्रद्धांजली अर्पण करुन नाना पटोले यांनी ईडी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, या महामार्गासाठी तब्बल ५४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आपण मोठे दिव्य काम केल्याचा डांगोरा हे सरकार पिटत असते पण हा महामार्ग खुला झाल्यापासून मागील सहा महिन्यात या महामार्गावर जवळपास ३०० अपघात झाले आहेत. प्रत्येक अपघातात कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत आहे. आजचा अपघात तर अत्यंत भिषण होता, २६ जणांचा मृत्यू होतो यातूनच या अपघाताची तीव्रता किती भीषण आहे हे दिसून येते.
समृद्धी महागामार्गातून काही मोजक्या लोकांचीच समृद्धी झाली आणि महामार्ग मात्र मृत्युचा सापळा बनला आहे. या महामार्गावर सुरक्षेच्यादृष्टीने अजून खूप करावे लागणार आहे. या महामार्गावरील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. सरकारने या रस्त्याचे विशेष ऑडीट केले पाहिजे तरच असे दुर्दैवी बळी जाणार नाहीत पण सरकारला फक्त जाहीरातबाजी करुन श्रेय लाटण्यातच धन्यता वाटते.
समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी सुद्धा तज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले आहेत. पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस वे साठी साठी निश्चित केलेले नियम पाळलेले दिसत नाहीत. रोड हिप्नॅासीसमुळे अपघात होतात असे काही काही तज्ञांनी सांगितले आहे त्यावर काही उपाय केलेले नाहीत. रस्त्यावर ठरावीक अंतरावर चहा पाणी जेवण मिळणारे हॅाटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. याचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना होतो तसेच रोड हिप्नॅासीस च्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
आतातरी सरकारने डोळे उघडावेत व समृद्धी महामार्गावरचे अपघात होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात. पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला या प्रश्नी जाब विचारणार आहोतच पण ईडी सरकार आजच्या अपघातातून काही बोध घ्यावा तात्काळ उपाय करावेत, असेही नाना पटोले म्हणाले.