शेतकऱ्यांना पोकरा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तातडीने द्या – अमोल शिंदे

पाचोरा, प्रतिनिधी | जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर हे पाचोरा येथे आले असता भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन देऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजने अंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तातडीने मिळावे अन्यथा पाचोरा व भडगावच्या शेतकऱ्यांसमवेत त्यांच्या कार्यालयास घेराव घातला जाईल असा इशारा दिला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वरदान ठरलेली आहे. माञ सदरील योजनेबाबत शेतकऱ्यांच्या समवेत चर्चा करत असताना असे निदर्शनास आले होते की शेतकरी / शेतकरी गटांना दिलेल्या लाभाच्या अनुदान (उदा. पाईप खरेदी, ठिबक तुषार सिंचन संच खरेदी, फळबाग लागवड, शेडनेट / पॉलिहाऊस उभारणी, मधुमक्षिका पालन, शेततळे इ.) अनुदान मागील ४ ते ५ महिन्यांपासून (डेस्क- ७) मुंबई स्तरावर प्रलंबित असून याबाबत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे निवेदनाद्वारे कळवले. तालुक्यातील ८८० शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लक्ष व भडगाव तालुक्यातील २०५ शेतकऱ्यांचे ७४.९९ लक्ष असे दोघे तालुक्यातील एकूण १०८५ शेतकऱ्यांचे एकूण ७ कोटी १९ लक्ष ९९ हजार अनुदान आज तागायत प्रलंबित असून याबाबत येत्या १० फेब्रुवारीपर्यंत सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरिता प्रयत्न करावे. अन्यथा अनुदान जमा न झाल्यास भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत आपल्या जळगाव येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यलयाला घेराव घालून आंदोलन करेल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथे आलेल्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांना प्रत्यक्ष भेटुन दिला. याप्रसंगी पं. स. सदस्य बन्सीलाल पाटील, प्रशांत सोनवणे, भैया चौधरी, पप्पु पाटील, तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content