मुंबई (वृत्तसंस्था) कधीतरी लॉकडाऊन काढावाच लागणार आहे. कोरोना व्हायरसवर लस येईपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार असेही नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याआधी 10 ते 15 दिवस आधी सांगणं आवश्यक आहे. काय होणार, कोणत्या गोष्टी सुरु होतील याची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने एक्झिट प्लॅन महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर ठेवावा, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, जे परप्रांतीय मजूर बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कन्टेन्मेंट झोनमध्ये फोर्स वाढव. काही ठिकाणी एसआरपीएफचे जवानही तैनात करावे. छोटे दवाखाने सुरु करावेत. तिथे एखाद्या पोलिसाची नेमणूक करावी. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी. तपासणी केल्याशिवाय परप्रातियांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींपर्यंत रोजगाराची माहिती पोहोचवावी. शाळा कशा सुरु करणार? पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.