मुंबई प्रतिनिधी | कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असून राज्य सरकारने त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आज पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले म्हणाले की, आर्यन खानविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यन खानला जमीन दिला असता. याबाबत समीर वानखडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे. तेच काम समीर वानखडे करीत आहे. असे चांगले काम करणार्या अधिकार्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकार्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी समीर वानखडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून समीर वानखडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे रामदास आठवले म्हणाले.