सफला एकादशीला घरूनच पूजन करा ; मुक्ताबाई मंदिर देवस्थानचे आवाहन

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्या शनिवार दि. ९ जानेवारी रोजी सफला एकादशीच्या दिवशी मुक्ताबाई मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

शनिवार दि.९ जानेवारी रोजी मार्गशीर्ष सफला एकादशी आहे. बारा महिन्यात महाशिवरात्री यात्रेनंतर येणारी सर्वात मोठी यात्रा असते. या यात्रेत राज्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नुकताच राज्यात कोरोना महामारीचा धोकादायक नवीन विषाणू आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार विश्वस्त मंडळाने संत मुक्ताबाई मंदिर कोथळी व मुक्ताईनगर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफला एकादशीला कोणीही वारीसाठी मुक्ताईनगर येथे येऊ नये, घरूनच मानसिक पूजन चिंतन करावे तसेच दुकानदारांनी वारी बंद असल्याने प्रसाद, फराळ व इतर दुकाने लावू नये असे निर्देश श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी व मुक्ताईनगर यांनी प्रसिद्ध केले आहे.

Protected Content