पुणे : वृत्तसंस्था । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले की, त्यांची कंपनी सप्टेंबरपर्यंत कोविड -१९ प्रतिबंधक दुसरी लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.
सीरम आणि अमेरिकी वॅक्सिन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे.
कोव्होवॅक्सची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोविड -१९ विषाणुच्या प्रकारांविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून त्याची एकूण कार्यक्षमता ८९ टक्के आहे, असे पूनावाला यांनी ट्वीट केले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ही कंपंनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली कोझिशिल्डची पहिली लस भारत आणि इतर अनेक देशांना पुरवठा करीत आहे. लसींचा तुटवडा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. भारतातील लसीकरण मोहीम अगदी योग्य प्रकारे सुरू असताना कंपनी आपल्या दुसर्या लसीच्या प्रकल्पाकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी पुण्यातील रुग्णालयात याच्या चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत.
यूकेमध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये कोव्होवॅक्सने करोना मूळ विषाणुच्या विरूध्द ९६ टक्के कार्यक्षमता दर्शविली होती.