आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । वीज परिमंडळ कार्यालयात अधिक्षक अभियंत्यासोबत गैरवर्तन करण्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता सर्वांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी जळगावच्या सहकार औद्योगीक वसाहतीमध्ये असणार्‍या वीज परिमंडळाच्या कार्यालयात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील शेतकर्‍यांसह अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांच्या भेटीसाठी आले. याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांच्या वीजचे कनेक्शन तोडल्याबद्दल विचारणा केली. याप्रसंगी फारूकी यांना हमरातुमरी करण्यात आली. त्यांना खुर्चीला बांधून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र एमआयडीसी पोलीस पोहचल्याने हे शक्य झाले नाही. तसेच आंदोलकांनी वीज परिमंडळ कार्यालयात कुलूप ठोकले.

या प्रकरणी लागलीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा समावेश होता. तर रात्री या संदर्भात औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, आज दुपारी मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ संशयितांना न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी न्यायालयाने आमदार चव्हाण यांच्यासह इतरांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content