सद्सद्विवेकबुद्धी हेच उत्तम पुरूषाचे लक्षण ; हभप चारूदत्त आफळे महाराज

भुसावळ, प्रतिनिधी । संत रामदास स्वामी यांनी श्रीदासबोधात आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आयुष्याची वाटचाल करण्यासाठी सारासार विचार करावा. कारण सद्सद्विवेकबुद्धी हेच उत्तम पुरूषाचे लक्षण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्त आफळे महाराज यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित ऑनलाईन संवाद सत्रात दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील संत रामदास स्वामी यांच्या “उत्तम लक्षण” या काव्यावर हभप आफळे महाराज यांनी संवाद साधला. प्रारंभी डॉ. प्रिया निघोजकर पुणे यांनी चारूदत्त आफळे महाराज यांचा अध्यात्मिक प्रवास कथन केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. नाशिक डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे म्हणाले की, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला हा उपक्रम भविष्यातील अध्ययन-अध्यापनासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. आफळे महाराजांनी सोप्या, रसाळ व मधाळ भाषेत संत रामदासांचे काव्य शिक्षकांपर्यंत पोहोचवले असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर हभप चारूदत्त आफळे महाराज म्हणाले की, संत रामदास स्वामी यांच्या लेखनात समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीची तळमळ आढळते. आदर्श व्यक्ती कसा असावा हे सांगताना श्रीदासबोधात समर्थ रामदासांनी विविध उदाहरणे दिली देऊन आहेत.
जनी आर्जव तोडू नये । पापद्रव्य जोडू नये ।
पुण्यमार्ग सोडू नये । कदाकाळी ।।
अशा एक ना अनेक ओव्यांमधून संत रामदासांनी उत्तम पुरूषाची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी दहा ओव्या दहावीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी घेण्यात आल्या आहेत. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे आणि आपली कीर्ती वाढवावी असा उपदेश संत रामदास स्वामी यांनी आपल्या काव्यातून केला असल्याचे आफळे महाराज म्हणाले. प्रज्ञा देशपांडे पुणे यांनी आभार मानले. ऑनलाईन संवाद सत्रात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Protected Content