सत्ता स्थापनेची चर्चा ; सुशील मोदी दिल्लीत

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बिहार राज्यातील नव्या सरकारच्या निर्मितीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. भाजपाचे विधीमंडळ पक्षचे नेते निवडण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

बिहारमधील निवडणुकीची रणधुमाळी निकालानंतर संपली असली तरी, आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. एनडीएने (उद्या)१५ नोव्हेंबर रोजी नवनिर्वाचित आमदारांची पाटणा येथे बैठक बोलावली आहे. कॅबिनेटच्या बांधणीत भाजपा कुठल्याप्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. संख्याबळामुळे यंदा भाजपाकडून जास्तीत जास्त मंत्रीपद व महत्वाचे विभाग मागितले जाऊ शकतात. राजनाथ सिंह हे उद्या पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असणार आहेत.

, संख्याबळानुसार कॅबिनेटमध्ये जास्तीत जागा भाजपाला हव्या आहेत. महत्वपूर्ण खात्यांवर देखील भाजपाचा यंदा दावा असणार आहे. जे अगोदर जदयूकडे असायचे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी सुशील मोदी यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे.
सुशील मोदी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतील. यानंतर तिन्ही नेते मिळून बिहारमध्ये भाजपाची भूमिका काय असेल, हे ठरवतील. याचबरोबर एनडीए आमदारांची संयुक्त बैठक देखील उद्या (१५ नोव्हेंबर) होणार आहे. यामध्ये नितीश कुमार यांची एनडीएचा नेता म्हणून निवड केली जाईल.

उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडून अतिमागासवर्गातून एखादे नाव पुढे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशप्रमाणे दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्मुला देखील अवलंबला जाऊ शकतो. भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आरएसएसशी निगडीत नेते कामेश्वर चौपाल यांच्या नावाची चर्चा आहे. चौपाल हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

Protected Content