नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रातील सत्ताधार्यांसाठी आंदोलनकर्ते शेतकरी व विद्यार्थी हे नक्षलवादी असले तरी भांडवलदार हे मित्र असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन आता आणखी चिघळल्याचे दिसत आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत भाजपा नेत्यांकडून विविध वादग्रस्त विधानं देखील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मोदी सरकारसाठी विरोध दर्शवणारे विद्यार्थी हे देशद्रोही, चिंतीत असणारे नागरीक शहरी नक्षलवादी, प्रवासी कामगार करोना वाहक, बलात्कार पीडित म्हणजे कुणीही नाही, आंदोलकर्ते शेतकरी हे तर खलिस्तानी आणि भांडवलादर म्हणजे सर्वात चांगले मित्र आहेत. असे जोरदार टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले आहे.
भाजपाचे मंत्री तसेच नेते मंडळींकडून शेतकर्यांच्या या आंदोलनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या आंदोलनात खलिस्तानी, चीन व पाकिस्तानचा हात असल्याची वक्तव्य भाजपा नेत्यांकडून केली गेली आहेत. याला राहूल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून येत आहे.