हाय अलर्टमुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले

a161

मुंबई (वृत्तसंस्था) भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनाचे आजचे कामकाज पूर्ण झाले असून मुंबई शहर आणि महाराष्ट्राची सुरक्षा लक्षात घेता, अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपुष्टात आणण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानमंडळात सांगितले. तसेच हा निर्णय विरोधी पक्षनेते, गटनेते आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ चार दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १३.२० तास कामकाज झाले आहे.

 

आणखी दोन दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात आले आहे. बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळवले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. तसेच आज सकाळीही बैठक झाली. त्यानंतर, आजच अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याच्या निर्णयाला सर्वच पक्षांनी सहमती दर्शवली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन आज संपुष्टात येत असल्याची घोषणा केली.

 

राज्यात हाय अलर्ट आहे. त्यामुळे अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. अधिवेशनासाठी सहा हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण वाढू शकतो, म्हणून अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करुन संपवून टाकू, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपणार हे रात्री उशिरा स्पष्ट झाले, कारण उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला व शेवटचा दिवस दाखवला आहे. अर्थसंकल्प मंजुरी व लगेचच लेखानुदानास मंजुरीही गुरुवारीच दाखवली आहे.

Add Comment

Protected Content