यावल, प्रतिनिधी | प्रत्येकात कौशल्य असते ते विकसित करण्यासाठी प्रेरणा जागृत झाली पाहिजे. गुन्हेगार व्हायला एक क्षण पुरेसा असतो; पण संस्कारी व्यक्ती घडायला अनेक वर्षे निघून जातात. जन्माला मूर्त स्वरूप देऊन सन्मानाने जगा,असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज. जि. म. वि. प्र. सह.समाज संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र भोईटे हे होते. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक धनवडे यांनी पुढे सांगीतले की, व्यक्ती कर्माने कधीच लहान होत नाही. कोणतेही कर्म आपल्या जागी श्रेष्ठ असतं. प्रामाणिकपणे केलेलं काम माणसाला मोठं करतं. स्वतःला वाईट मार्गाला नेऊ नका संस्कारी माणूस देशाचा जबाबदार नागरिक बनत असतो. याकार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष वीरेंद्र भोईटे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.आर.गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. एस. पी. कापडे, प्रा.आर.डी.पवार, उपप्राचार्य एम.डी.खैरनार, उपप्राचार्य ए.पी.पाटील, प्रा.संजय पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.